
भुसावळ प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे या फक्त तरूणच नव्हे तर कार्यक्षम खासदार असून त्यांचे काम हे अन्य लोकप्रतिनिधींसाठी पथदर्शी ठरणार असल्याचे कौतुकोदगार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ते शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भुसावळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील मुख्य कार्यक्रम हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यात खासदार रक्षाताई खडसे यांच्या कार्यवृत्ताच्या प्रकाशनासह विविध योजनांच्या भूमिपुजनाचा समावेश होता. याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून रक्षाताई खडसे यांच्या कार्याचा गौरव केला. रक्षाताईंनी आपल्या कार्यकाळात विविध योजनांचा गती दिल्याबद्दल त्यांनी कौतुकोदगार काढले. ते म्हणाले की, खरं तर लोकसभेचा मतदारसंघ इतका मोठा असतो की, पाच वर्षात यातील निम्मे गावेदेखील फिरून होत नाहीत. कारण खासदारांना वर्षातून चार महिने संसदेचे सभागृह असते. याच्या जोडीला अन्य कार्यक्रम असतात. माझ्या माहितीतील अनेक खासदार हे चार-पाचदा निवडून आले तरी ते त्यांच्या मतदारसंघात पोहचू शकले नाही. मात्र रक्षाताई या अवघ्या साडेचार वर्षात मतदारसंघातील ९५ टक्के गावांपर्यंत पोहचल्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले. त्यांचे काम हे पथदर्शी ठरणार असल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले.
भुसावळ येथील अतिक्रमितांना घरकुले मिळण्यासाठी तत्वत: मंजुरी देण्यात आली असून मंत्रीमंडळाच्या बैठकीला याला मंजुरी देण्यात येणार असल्याची घोषणादेखील त्यांनी केली. याच्या अंतर्गत पाच हजार बेघरांना घरे देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याप्रसंगी त्यांनी मेगा रिचार्ज प्रोजेक्ट लवकरच मार्गी लागणार असून कृषी विद्यापीठासही लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
पहा– मुख्यमंत्री फडणवीस खासदार रक्षाताईंबाबत नेमके काय म्हणाले ते !


