कपिलेश्वर देवस्थानसाठी दोन कोटी मंजूर – आ. चौधरी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निम येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिराच्या भक्तनिवास इमारतीसाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. शिरीष चौधरी यांनी दिली आहे. या उल्लेखनीय विकास कामाबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व राज्याचे पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. या कामामुळे भक्तांना मंदिरस्थळी निवासाची सोय उपलब्ध होणार आहे.

तापी, पांझरा व अनेर नदीच्या त्रिवेणी संगमावर निसर्गरम्य वातावरणात कपिलेश्वर देवस्थान असून याठिकाणी हे भव्य व पुरातन हेमाडपंथी शिव मंदिर आहे, राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी शेकडो वर्षांपूर्वी याची निर्मिती केली असून हे देवस्थान जळगाव ,धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सुपरिचित आहे. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीला याठिकाणी मोठी यात्राही भरत असते. याव्यतिरिक्त वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरुच असतात तसेच तपस्वी साधू संतांचे देखील याठिकानी वास्तव्य असते. अशा विविध कारणांनी संपन्न असलेल्या मंदिरात भाविकांच्या निवासासाठी भक्त निवास असावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती. यासाठी कपिलेश्वर देवस्थान समितीने आ.चौधरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर आ. चौधरी यांच्या प्रयत्नांना यश येऊन पर्यटन विकास विभागाने भक्त निवासासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या निधीतून भव्य असे भक्त निवासाचे निर्माण होणार आहे. याशिवाय अन्य तीर्थक्षेत्रांप्रमाणे या ठिकाणी आवश्यक त्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

Add Comment

Protected Content