जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून जळगाव तालुक्यात सुरू असलेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि घरांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मंगळवारी दुपारी २ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १५ ते १७ ऑगस्ट या कालावधीत जळगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती खरडून गेली असून, उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीपिकांसोबतच अनेक घरांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले असल्याची माहिती निवेदनात नमूद आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे, जळगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळे तसेच जिल्ह्यातील इतर अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शासनाने द्यावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यासाठी तलाठी, सर्कल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक अधिकारी यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच, जळगाव तालुक्यातील पीक विमा मंजूर करण्यात यावा आणि नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, जळगाव जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रमुख मागणी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील महानगरप्रमुख शरद तायडे अशोक सोनवणे आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांची उपस्थिती होती.



