जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी वॉटरग्रेस कंपनीतर्फे कचरा संकलनासाठी लावण्यात येणार्या ट्रॅक्टरसह अन्य वाहनांमध्ये कचर्याऐवजी तोडलेली झुडपे असल्याचा प्रकार सलग दोन दिवस उघड करून आयुक्तांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती. आज सोमवारी अभिषेक पाटील, ऍड. कुणाल पवार व आयुक्त सतीश कुलकर्णी यांची मनपात बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे गुलदस्त्यातच आहे.
कचरा संकलन आणि विल्हेवाटीचा ठेक्यात गैरव्यवहार होत असून तो सुखाने चालावा म्हणून सर्वच नगरसेवकांना दर महिन्याला पाकिटे दिली जातात असा आरोप अभिषेक पाटील यांनी केल्यावर खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त व अभिषेक पाटील यांची भेट महत्वपूर्ण आहे.
मनपात महापौरांच्या दालनात आयुक्तांनी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेसाठी गट नेत्यांची बैठक घेतली. यावेळी शिवसेना, एमआयएम, भाजपचे गटनेते देखील उपस्थित होते. बैठक झाल्यावर अभिषेक पाटील यांनी आयुक्तांना घेऊन महापौर कार्यालयातील अँटी चेंबर मध्ये ऍड.कुणाल पवार सह बंद दाराआड चर्चा केली. मात्र आयुक्तांनी अभिषेक पाटलांना चर्चेसाठी बोलावले होते काय ? हे समजू शकले नाही. चर्चेतून बाहेर आल्यावर अभिषेक पाटील लगेच निघून गेले . मात्र बैठकीत काय चर्चा झाली याविषयी माहिती मिळाली नाही.यामुळे राजकीय व मनपाच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे.