भूसावळ, प्रतिनिधी | भुसावळ रेल्वे विभागात ‘स्वच्छ भारत मोहीम’ यशस्वी करण्यासाठी विभागीय रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी आपल्या अखत्यारीतील रेल्वे स्थानकांवर दर शनिवारी ही मोहीम राबवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार आज (दि.१३) भुसावळ, जळगाव आणि पाचोरा स्थानकांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
रेल्वे प्रबंधकांनी विभागातील सगळी ए-१, ए व बी. दर्जाची १५ स्थानके चार भागांमध्ये विभागली असून आणि दर शनिवारी या सर्व स्थानकांवर पूर्ण स्वच्छता करण्याचे ध्येय ठेवले आहे. ज्यासाठी बाहेरच्या स्वयंसेवी संस्थांनाही निमंत्रित करून त्यांची मदत घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत आज भुसावळ, जळगाव आणि पाचोरा स्थानकांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.
भुसावळ स्थानकावर ज्येष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक आर.के. शर्मा, स्टेशन संचालक आर. अय्यर, आणि जीवन ज्योती हेल्थ केअर निसर्गोपचार योग केंद्र, आणि रेल्वे कर्मचारी यांनी यात श्रमदान केले. जळगाव स्थानकावर वाणिज्य प्रबंधक (टी.सी.) अजय कुमार यांच्या उपस्थितीत धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आणि रेल्वे कर्मचा-यांनी श्रमदान केले. पाचोरा स्थानकावर, श्री.गो.से. हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी आणि रेल्वे कर्मचार्यांनी सहभाग नोंदवला.