शेंदूर्णी नगरपंचायतकडून स्वच्छतेचा देखावा

जिल्हाधिकारी येणार असल्याने मुख्य रस्त्यांची सफाई

शेंदूर्णी-विलास अहिरे । शेंदूर्णी येथील नगरपंचायत स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद येणार असल्याने येथील नगरपंचायतने  नगरपंचायतच्या नियमित सफाई कामगारांना वेठीस धरून रात्री ८/९ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी येणार असल्याचे मार्गावरील रस्ते स्वछ करून घेतले व स्वच्छता अभियानात नगरपंचायत सक्रिय असल्याचा देखावा निर्माण केला होता.  प्रत्यक्षात मात्र दैनंदिन स्वच्छता ठेका दिलेल्या ठेकेदारांचे कर्मचारी २ महिन्यापासून शहरात स्वच्छता व कचरा संकलन करत नसल्याने मुख्य रस्ते आठवड्यात एकदा तर छोट्या गल्लीत महिन्यातून एकदा सफाई केली जात आहे.

१ ते १४ ऑक्टोबर २०२३ या काळात स्वच्छता पंधरवडा पाळण्यात येणार असल्याचे शासन स्तरावरून जाहीर करण्यात आले असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यानिमित्ताने जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतला भेटी देऊन स्वच्छता अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. आजच्या स्वच्छता अभियानात जिल्हाधिकारी यांना दर्शविण्यासाठी शहर स्वच्छता कचरा संकलन घंटा गाडी नियोजन फलक लावण्यात आले असले तरी अनेक भागात ५/५ दिवस घंटागाड्या जात नसल्याने घरातील कचरा कुंड्या भरल्याचे फोटो शेंदूर्णीतील नागरिकांनी सोशल मीडियावर टाकली व नगरपंचायतचे स्वच्छता अभियानावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. जिल्हाधिकारी यांनी स्वच्छता पंधर वाड्याचे महत्व पटवून देत एक तास स्वच्छतेसाठी नागरी स्वच्छता अभियानाची सुरुवात आज दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रविवारी शेंदूर्णी येथे केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद  यांनी स्वतः आठवडे बाजार परिसरातील स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन श्रमदान केले त्यांनी नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी नदी किनारी धोबी घाट बांधण्यात यावे अशी सूचना मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांना केली व नगरपंचायत मार्फत सुरू असलेल्या विकास कामांचे कौतुक केले.

यावेळी नागरिकांनी जिल्हाधिकारी यांचा विविध समाज, संघटना यांनी सत्कार केला. शेंदूर्णी शहर पत्रकार संघटनेने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सत्कार केला तेव्हा त्यांनी मी पण पत्रकार म्हणून काम केले असल्याचे आवर्जून सांगितले.  शेंदूर्णी नगरपंचायत मुख्याधिकारी व पदाधिकारी यांनी स्वच्छता अभियानात देश स्तरावर पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले यावेळी कार्यक्रमात भाजपचे नेते गोविंद अग्रवाल माजी उपनगराध्यक्ष चंदाबाई अग्रवाल, निलेश थोरात व नगरसेवक, नगरसेविका,नगरपंचायत अधिकारी,कर्मचारी व नगरपंचायत सफाई कामगार , आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका गावकरी उपस्थित होते.

Protected Content