शिवसेनेत वादाची ठिणगी : जिल्हाप्रमुख पदावरून रस्सीखेच !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख पदावरून पक्षातील अंतर्गत कलह उफाळून आला असून यात काल रात्री उशीरापर्यंत स्थगितीचा खेळ रंगल्याचे दिसून आले.

विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तेव्हाच भंगाळे यांना पक्षात मानाचे स्थान मिळेल असे मानले जात होते, आणि झाले देखील तसेच ! गेल्या आठवड्यात विष्णू भंगाळे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर नियुक्त करण्यात आले. तर तेव्हाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांना पक्षाने सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली.

दरम्यान, विष्णू भंगाळे यांच्या नियुक्तीनंतर निलेश पाटील हे नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली. यातच काल सायंकाळी विष्णू भंगाळे यांच्या जिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. याला काही तास उलटत नाही तोच पुन्हा नवीन पत्राच्या माध्यमातून विष्णू भंगाळे यांना जिल्हा प्रमुखपदी कायम ठेवण्यात आले असून निलेश पाटील यांच्यावर सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या माध्यमातून शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत कलह समोर आल्याचे दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Protected Content