साकळी येथे दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील साकळी गावातील वार्ड क्रंमांक ५ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पुरवठा होत असून दुषित पाण्याची समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दूषित पाण्यामुळे संपुर्ण भवानी पेठ भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या भागातील रहिवासी विलास पवार यांनी या दूषित पाण्याची समस्या अतिशय गांभीर्याने व पोटतिडकीने मांडत या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन केव्हा लक्ष देणार ? असा संतप्त प्रश्न व्यक्त करत ‘साहेब…! तुम्ही हे दुषित पाणी आधी पिऊन बघा ‘ असे सांगत या नागरी समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले.तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून ही समस्या लवकरात-लवकर न सोडविल्यास वरिष्ठ प्रशासनाकडे तक्रार करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी या भागातील रहिवासी ग्रामस्थ करीत आहे.

याबाबत सविस्तर असे की,साकळी ता.यावल येथील वार्ड क्रं.५ मध्ये भवानीपेठ भागात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याची समस्या निर्माण झालेली असून जेव्हा जेव्हा या भागात पाणी पुरवठा होतो त्यावेळी अगोदर पिवळसर रंगाचे,पिंगट दुर्गंधीयुक्त तसेच किळसवाणे पाणी पाईपातून नळावाटे घराघरात येत असते.हे पाणी जेव्हा घराघरात पोहचते तेव्हा सर्वच घरातून सुरुवातीला किमान दहा ते पंधरा मिनिटे पाणी वाया जाऊ दिले जाते मग त्यानंतर नागरिक पाणी भरण्यास सुरुवात करतात. पाणी भरत असताना सर्वच नागरिक विशेष करून महिलावर्ग घाबरत- घाबरतच हे पाणी भरतात व नाईलाजास्तव पिण्यासाठी वापर करीत असतात.या दूषित स्वरूपाच्या पाणीपुरवठ्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य पुर्णपणे धोक्यात आलेले आहे.या समस्येविषयी ग्रामपंचायतीकडे लेखी व तोंडी तक्रार करण्यात आलेली असून या भागातील ग्रामपंचायत सदस्यांनाही तोंडी स्वरूपात कळविले आहे. मात्र अद्याप या समस्येवर कुठलीही उपायोजना करण्यात आलेली नाही.दरम्यान दि.५ फेब्रुवारी २०२४ रोजी ग्राम पंचायत प्रशासना कडून आयोजित ग्रामसभेत सदर भागातील रहिवासी विलास लक्ष्मण पवार यांनी सदर समस्या मांडत ही समस्या सोडवली जात नसल्याने रोष व्यक्त केला.

सदर ग्रामसभा ही तहकूब ग्रामसभा होती. या सभेला कोरमची आवश्यकता नसते. तथापि ग्रामसभेला मोजकेच ग्रामस्थ उपस्थित असल्याने ग्रामसभा थोडक्यात आटोपत असतांना भवानी पेठ मधील दूषित पाण्याची समस्या केव्हा सोडवली जाणार ? या समस्येचं ग्रामपंचायतीला गांभीर्य आहे की नाही ? अशा स्वरूपाची विचारणा विलास पवार यांनी प्रभारी ग्रामविकास अधिकारी पी.टी.धनगर यांच्याकडे केली.साहेब…! आमच्या भागातील पाणी आम्ही कसे प्यायचे? हे पाणी तुम्ही पिऊन दाखवा मग तुम्हाला या समस्येचं गांभीर्य कळेल. या समस्येवर चर्चा झाली पाहिजे अशी संतप्त भावना विलास पवार यांनी व्यक्त केली.सभा आटोपली म्हणून घरी जाण्यासाठी निघालेले सरपंच दिपक पाटील, उपसरपंच फक्रोद्दीनखान कुरेशी तसेच काही पदाधिकारी यांना ग्रामविकास अधिकारी धनगर यांनी बोलावून घेतले व पवार यांचे म्हणणे ऐकून घेत सदर समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्याची चर्चा केली.
दरम्यान या भागातील दूषित पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी यांनी या अगोदर घराघरातील नळांची पाहणी केली. मात्र सदर समस्येचे मुळ कोठे आहे.हे समजलेले नाही.त्यामुळे ही समस्या ‘जैसे थे’ आहे.एकूणच या दुषित पाण्याच्या समस्येमुळे या भागात जलजन्य आजाराची साथ देऊ शकते.

नेहमीचे अनभिज्ञ असलेल्या व नुसते कागदी घोडे नाचविणाऱ्या साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राला या समस्येविषयी माहिती आहे किंवा नाही देव जाणे. वरिष्ठांकडे तक्रार करणार-विलास पवार- आमच्या भवानी पेठ भागातील उद्भवलेली दूषित पाण्याची समस्या अतिशय गंभीर व जिवघेणी असून तक्रार करूनही ती अद्याप पर्यंत सोडवली गेलेली नाही.तरी येत्या काही दिवसात ही समस्या ग्राम पंचायत प्रशासनाने न सोडविल्यास या समस्येविषयी वरिष्ठांकडे तक्रार करण्याअगोदर सदर पाण्याची रितसर आरोग्य प्रशासनाकडून तपासणी करून घेतली जाणार आहे व त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणारा असल्याचे विलास पवार यांनी सांगितले.

Protected Content