नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशातील ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारने मोठी बातमी दिली आहे. आयुष्मान भारत योजनेचा विस्तार करण्यात आला असून आता या योजनेतून ७० वर्षे ओलांडलेल्या सर्व वृद्धांवर देखील उपचार केले जाणार आहेत. संसद अधिवेशनाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही माहिती दिली. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात आयुष्मान भारत योजनेची कार्यकक्षा वाढवण्याचं व त्यात ७० वर्षांवरील नागरिकांना समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले जाणार आहे.
नव्या सरकारच्या स्थापनेनंतर लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाला राष्ट्रपती मुर्मू यांनी संबोधित केले. ७० वर्षांवरील सर्व व्यक्तींना आयुष्मान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. एवढंच नाही तर सरकार सातत्यानं शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. पीएम किसान योजनेतून सुमारे २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना अधिक स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं त्या म्हणाल्या.
भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांचा उल्लेख केला होता. ‘आजारी पडल्यास उपचार कसे करायचे ही वृद्धांच्या समोरची मोठी चिंता असते. मध्यमवर्गीयांसाठी ही चिंता अधिकच गंभीर आहे. त्यामुळंच ७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला आयुष्मान भारत योजनेत आणण्याचा संकल्प भाजपनं केला आहे, असं मोदी म्हणाले होते.