नागरीकांना घरपोच शिधापत्रिका मिळणार : जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

d141bab1 0ded 49e0 84f8 fc9fd57ec042

 

जळगाव (प्रतिनिधी) शिधापत्रिका मिळण्यासाठी नागरीकांनी अर्जासोबत सर्व कागदपत्रांची परिपूर्ण पूर्तता करुन दिल्यानंतर त्यांना शिधापत्रिका मिळण्यासाठी पुन्हा तहसील कार्यालयात यावे लागू नये. तर शासकीय यंत्रणेमार्फतच शिधापत्रिका घरपोच करावी. याबाबत पुरवठा विभागाने सर्व तहसील कार्यालयांना तातडीने सुचना देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पुरवठा विभागास दिले.

 

जिल्हास्तरीय दक्षता समितीची मासिक बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, तहसीलदार (पुरवठा) मिलींद कुलकर्णी, सहकार विभागाचे श्री. खैरे यांचेसह अशासकीय सदस्य सुनिल जावळे, महेंद्र बोरसे, रामकृष्ण पाटील, डॉ. श्रीमती.अर्चना पाटील, मिनाताई तडवी, सुलभा पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, नागरीकांना पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका व विविध अर्जांचे नमुने मिळण्यासाठी शासनाने किंमत निर्धारित केली आहे. यापेक्षा कोणी अधिक किंमत घेत असेल तर नागरीकांनी तक्रार करावी. यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात तक्रारी पेटी ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात. तसेच जे रेशन दुकानदार ग्राहकांना कमी धान्य देतील त्यांची तक्रार ग्राहकांनी तक्रार पेटीद्वारे करावी. जे रेशन दुकानदार त्यांचे धान्य वेळेवर उचलणार नाही त्यांची तपासणी करण्याचे निर्देशही दिलेत. रेशन दुकानदारांनी दुकानाच्या दर्शनी भागावर दुकानदाराचे नाव, मोबाईल क्रमांक, दुकान उघडण्याची, बंद करण्याची तसेच भोजनाची वेळ असलेला बोर्ड लावणे आवश्यक असल्याचेही सांगितले. त्याचबरोबर अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबाच्या लाभार्थ्यांची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लावावी. जेणेकरुन ग्रामस्थांना लाभार्थ्यांची नावे माहिती होतील. तसेच जे लाभार्थी या योजनांच्या निकषांमध्ये बसत नसतील त्यांनी आपली नावे वगळण्याबाबत अर्ज करण्याचे आवाहन केले. तसेच पुरवठा विभागामार्फत या योजनांचा आढावा घेऊन अपात्र लाभार्थी वगळण्याची कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करुन वगळण्यात आलेल्या जागी पात्र लाभार्थ्यांचा समावेश होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिलेत.

शिधापत्रिका मिळण्यासाठी शासनाने ठरविलेली किंमत- शिधापत्रिकेचा प्रकार व सुधारित दर पुढीलप्रमाणे- नवीन पिवळी शिधापत्रिका दहा रुपये, नवीन केशरी शिधापत्रिका वीस रुपये, नवीन शुभ्र शिधापत्रिका पन्नास रुपये, दुय्यम पिवळी शिधापत्रिका वीस रुपये, दुय्यम केशरी शिधापत्रिका चाळीस रुपये, दुय्यम शुभ्र शिधापत्रिका शंभर रुपये याप्रमाणे दर निश्चित केले आहे. यापेक्षा अधिक दर नागरीकांनी देवू नये. कोणी अधिक रक्कमेची मागणी केल्यास पुरवठा विभागाकडे तक्रार करण्याचे अवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Protected Content