मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार असून आज शुक्रवारी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस असून एकेक मताला महत्व आले आहे. आणि घोडेबाजार करण्यासाठीच सातवा उमेदवार या आरोपामुळे या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ उमेदवार घरी जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार तर भाजपचे पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक असे सात उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
राज्यात भाजपा १०६ , शिवसेना ५५ , राष्ट्रवादी ५३, काँग्रेस ४४, आणि अपक्षांसह छोटे पक्ष २९ असे २८७ आमदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीचे मंत्री मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे इडीच्या कारवाईमुळे अटकेत असल्याने न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीत अस्वस्थता असून दोन मतांचे गणित बिघडले आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते मिळण्याचा महाविकास आघाडीला अंदाज असला तरी आ. ठाकूर साथ देतील कि नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मतासाठी चुरस असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी पहिल्या दीड तासांत ५० टक्के आमदारांनी मतदान करीत १४३ आमदारांना मतदानाचा हक्क बजावला असून भाजपाच्या ६० पेक्षा अधिक तर, काँग्रेसच्या २० आमदारांचे मतदान झाले आहे.
महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील
एकूणच भाजपने या निवडणुकीत महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यात सफल होणार नाहीत. एमआयएम आणि अन्य पक्षांनी कोणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा विषय आहे, पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. तर महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी वा मतभेद नाहीत. विरोधी पक्षाकडून चूकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप करीत राज्यसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतीलच, असा विश्वास खा.संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.