गावठी कट्टे आणि काडतुसांसह तिघांना अटक

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मध्यप्रदेशातून गावठी कट्टे घेऊन येणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली असून दोघे जण मात्र फरार झाले आहेत.

नाशिक येथील पोलिस महानिरीक्षकांचे पथक व चोपडा ग्रामीण पोलिस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी दुपारी मोठी कारवाई केली आहे. चोपडा ते बोरअजंटी रस्त्यावरून काही जण गावठी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलीस पथकाने तेल्या घाटाच्या खाली दुपारी सापळा लावल्या. सुमारे तीन वाजेच्या सुमारास एमएच -१२, एफयू- ००६१ क्रमांकाच्या पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओला थांबवून पोलिसांनी झाडाझडती घेतली. यात गणेश बाबासाहेब केदार (वय २४), कालिदास दत्तात्रय टकले (वय २८), विकास अप्पासाहेब गिरी (वय २२) या अहमदनगर तालुक्यातील रहिवासी असलेल्या तिघांच्या ताब्यातून तीन पिस्तूल व १४ जिवंत काडतूसे असा एकूण ६ लाख ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर याच वाहनातील दोघांनी मात्र घटनास्थळावरून पलायन केले आहे.

सदर कारवाई पोलिस महानिरीक्षक पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहोम, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, पीएसआय अमरसिंग वसावे, गणेश जाधव, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शब्बीर शेख, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलिक, प्रमोद पारधी, लक्ष्मण शिंगाणे यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी बशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीएसआय अमरसिंग वसावे करत आहेत.

Protected Content