चोपडा-शिरपूर रस्त्याची चाळण; वाहनधारक व प्रवासी त्रस्त

damaged road

चोपडा प्रतिनिधी । चोपडा येथून शिरपुरला जाणार्‍या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. पण जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यांचे मात्र बारा वाजले आहे. परंतु याची दखल ना प्रशासन घेतेय ना लोक प्रतिनीधी. सामान्य नागरिक मात्र आता चांगले वैतागले असून प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. चोपडा शहरालगत चोपडा-शिरपूर रोडवरील टोलनाका, हॉटेल जयेशसमोर, अकुलखेडे येथील बसस्थानक, चंपावती नदीवरील पूल याठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे. याच खड्ड्यांमुळे याठिकाणी सतत अपघात होत असून १५ दिवसांपूर्वी एकाला आपले प्राण गमवावे लागले आहे तर एक रुग्णालयात दाखल आहे.

या रस्त्यांची दुरवस्था सरकार किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला कशी दिसत नाही असा सवाल नागरिकांना पडला आहे. तात्पुरती डागडुजी म्हणून मुरूम टाकून ही समस्या सोडवली जाऊ शकते. परंतु प्रशासन सुस्त असून नागरिक – वाहन चालक त्रस्त आहे अशी अवस्था आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना न केल्यास अकुलखेडे व चहार्डी येथील नागरिक उपोषणाला बसतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Protected Content