चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील काजीपुरा येथे सध्या विक्रीस प्रतिबंध असणार्या कापसाच्या बियाण्यांची विक्री केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने एचटीबीटी कापूस बियाण्याचे उत्पादन, वितरण, विक्रीस प्रतिबंध केला आहे. मात्र बंदी असून काही ठिकाणी याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने तालुक्यातील काजीपुरा गावातील दत्तात्रय शालिग्राम पाटील यांच्याकडे विक्री सुरू असल्याची माहिती कृषी खात्याच्या पथकाला मिळाली होती.
या माहितीनुसार काल सायंकाळी छापा मारला असता, ४ लाख १६ हजार २५० रुपये किमतीची, पिंक कॉट कापूस बियाण्याची ३३३ पाकिटे आढळली. जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके यांनी ही कारवाई केली.
या याप्रकरणी दत्तात्रय पाटील याच्या विरूध्द कापूस बियाणे नियंत्रण आदेश १९८३ चे खंड ३,४,७,८ (अ) ९ चे उल्लंघन करण्यासह विनापरवाना बियाणे साठवणूक व विक्री केल्याचा गुन्हा चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.