सख्ख्या भावाचा खून : लासुरातील भयंकर घटना

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील लासूर येथे भावानेच भावाचा खून केल्याची भयंकर घटना घडली असून या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, ५ जानेवारी रोजी लासूर येथील रतिलाल जगन्नाथ माळी (३२) यास मारहाण केल्याने त्याचा मुत्यू झाला होता. चारित्र्याच्या संशयावरून हे कृत्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली होती. या प्रकरणी मयताच्या भाऊ प्रदीप उर्फ आबा जगनाथ माळी (२८) रा. लासूर याच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात मंगेश नवल महाजन, विकास नवल महाजन, भूषण कैलास मगरे, दादु राजेंद्र साळुंखे (सर्व रा. लासुर) या चौघांचा समावेश होता.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवली असता, त्यांना या प्रकरणातील महत्वाचे धागेदोरे हाती लागले. यानुसार या खून प्रकरणातील फिर्यादी प्रदीप उर्फ आबा जगन्नाथ माळी यानेच आपल्या भावाला मारहाण करून त्याचा खून केला. व बनाव करून इतरांना यात अडकवल्याचे निष्पन्न झाले. रतीलाल याने अनेकदा महिलांची छेड काढल्याने समाजात नाव खराब होत असल्याचा राग प्रदी उर्फ आबा माळी याच्या मनात होता. यातूनच त्याने आपल्या भावाचा खून केल्याचे स्पष्ट झाले. अर्थात, फिर्यादीच आरोपी बनल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे तसेच अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप आराक, पोलीस उपनिरीक्षक अमर विसावे, हवालदार भरत नाईक, राजू महाजन, सुनील जाधव, संदीप धनगर, ईशी पोलीस नाईक विकास सोनवणे, विष्णू भिल, रितेश चौधरी, पोकॉ. सुनील कोळी यांनी या गुन्ह्याची उकल केली.

Protected Content