चोपडा ‘मसाप’तर्फे ‘बिल्वदल शब्दसुरांची मैफिल’ उत्साहात

chopda maifil

 

चोपडा प्रतिनिधी । येथील महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा व श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गीत रामायणकार ग.दि.माडगूळकर, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व प्रतिभावंत साहित्यिक पु.ल. देशपांडे आणि ख्यातनाम संगीतकार सुधीर फडके ‘बाबूजी’ यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत ‘बिल्वदल शब्दसुर’ या मैफिलचे आयोजन नुकतेचे करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘बिल्वदल शब्दसुर’ कार्यक्रम दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता येथील नगरपरिषद नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात गदिमांची सुधीर फडकेंनी स्वरबद्ध केलेली गाणी, गदिमांच्या कवितांचे वाचन व पुलंचे मजेशीर किस्से सादर करण्यात आले. गदिमांच्या विविध ढंगातील, बाजाच्या आणि आशयाच्या कविता यांचे प्रभावी वाचन विलास पाटील, योगिता पाटील, गौरव महाले, संजय बारी यांनी सादर केले. तर कोट्याधीश पुलंचे प्रसंगनिष्ठ, शब्दनिष्ठ विनोद व हजरजबाबीपणाचे किस्से विलास पाटील, गौरव महाले व संजय बारी यांनी सांगितले. मनोज चित्रकथी, सतिश पाटील, योगेश चौधरी यांनी गदिमांची सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या भावगीते, भक्तिगीते, लावणी, नाट्यगीत, देशभक्तीपर रचना सुमधुर आवाजात सादर केल्या. त्यांना तबल्यावर नरेंद्र भावे, विजय पालीवाल यांनी तर बी. यु. जाधव (बासरी), विवेक बाविस्कर (सिंथेसायझर), स्वप्निल ठाकुर (गिटार) यांनी साथसंगत केली.

गदिमांच्या गीत रामायणातील ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती….’ या भक्तीगीतापासून सुरू झालेला या मैफलीचा प्रवास गदिमांच्या ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य….’ या देशभक्तीपर गीतापर्यंत अखंड सुरू होता. ‘कानडा राजा पंढरीचा…’, ‘उठ पंढरीचा राजा…’, ‘देव देव्हाऱ्यात नाही…’, ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी…’, ‘नाही खर्चीली कवडी दमडी…’, ‘झाला महार पंढरीनाथ…’, ‘सखी मंद झाल्या तारका…’, ‘माझे जीवन गाणे….’, ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला…’ यासारख्या गीतांनी कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली.

तर ईश्वराचा अंश, माहेर, गृहसाम्राज्य, काव्याची किंमत, पर्गती, जन्म-मृत्यू, मातृवंदना, मैनाराणी चतुर शहाणी, कुंभारासारखा गुरु नाही रे या विविधांगी कवितांनी कार्यक्रमाची उंची आणखी वाढवली. दरम्यान सादरकर्त्यांनी अत्यंत सुबकपणे पेरलेल्या पुलंच्या अनेक विनोदी किस्स्यांनी रसिकांना मनमुराद हसविले. गाणी-कविता-किस्से असा एकत्रितअनुभव देणाऱ्या चोपड्यातील या पहिल्याच कार्यक्रमास चोपडेकर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. भविष्यात अशाच दर्जेदार कार्यक्रमाची अपेक्षा रसिकांतर्फे नगरसेवक डॉ. रवींद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी चोपडा शाखेचे अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. विकास हरताळकर, नगर वाचन मंदिराचे उपाध्यक्ष प्रा.एस.टी. कुलकर्णी, चोपडे शिक्षण मंडळाच्या सचिव माधुरी मयूर, ज्येष्ठ नागरिक अशोकलाल गुजराथी, नगरसेवक डॉ. रवींद्र पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येऊन प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले होते. कवी अशोक सोनवणे यांनी प्रास्ताविकातून भूमिका मांडत तीनही सारस्वतांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. या अनोख्या मैफिलीचे निवेदन प्रमुख कार्यवाह संजय बारी यांनी केले.

Protected Content