चोपडा, प्रतिनिधी | जळगाव येथे केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमीतर्फे आयोजित भुलाबाई महोत्सवात खुल्या गटात चोपडा येथील नानाश्री प्रतिष्ठान संचलित नेवे महिला मंडळ यांनी आपल्या कला-गुणांचे नेत्रदिपक सादरीकरण करुन प्रथम क्रमांकाचे बक्षिस प्राप्त केले.
नानाश्री प्रतिष्ठान संचलित या महिला मंडळाने सातत्याने बक्षीस मिळवत ‘हॅटट्रीक’ साधली आहे. नेवे महिला मंडळ यांनी भुलाबाई च्या गीतातून अतिशय उत्तम साजरीकरण करत सामाजिक व मार्मीक संदेश दिला. ज्वलंन्त व सद्यस्थिती च्या विषयांची निवड , साजेशी वेशभुषा यांची सुयोग्य रितीने सांगड घालत…. चंद्रयान, प्लास्टिक मुक्ती , महाराष्ट्रातील महापूरात सैनिकांनी केलेली मदत या विविध विषयांवर प्रकाश टाकला.या गितामध्ये जागृती संजय नेवे, पल्लवी रुपेश नेवे, सुप्रिया राजेंद्र नेवे, रंजना श्रीकांत नेवे, मोहिनी सतीश नेवे, भारती राजेंद्र नेवे, आम्रपाली नेवे – पाटील, मेघा रवींद्र नेवे यांनी विविध भुमिका पार पाडल्या. भारती नेवे यांनी सादर केलेली पंतप्रधान मोदींची भुमिका सभागृहात आकर्षक ठरली. या गीताचे गायन श्वेता रमेश नेवे व संगीता संजय नेवे यांनी केले. तर संगीत साथ भुवनेश नेवे (तबला),व तुषार वैद्य (हार्मोनियम) यांनी दिली.
चोपड्यात जल्लोषात स्वागत
दरम्यान भुलाबाई महोत्सवातील विजेत्या संघाला मिळालेल्या आकर्षक ट्रॅाफीसह त्यातील महिलांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.यावेळी नानाश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत नेवे,संघाचे मार्गदर्शक प्रा.संजय नेवे, संजय डी.नेवे, राजेंद्र नेवे, सतिष नेवे, रवींद्र नेवे, प्रमोद नेवे, प्रा.रुपेश नेवे, सागर नेवे, सौरभ नेवे, आयुष नेवे, सुमनबाई नेवे, सुवर्णा नेवे, दिपाली नेवे, प्रगती नेवे आदी उपस्थित होते.