चोपडा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अडावद येथील सार्वजनीक विद्यालयात संस्थेच्या अध्यक्षांची बनावट स्वाक्षरी करून शिक्षक भरती करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडावद येथे बनावट स्वाक्षरी करून शिक्षक भरती करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अडावद परिसर शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब चिंतामण देशमुख यांनी प्रोसिडींग बुकमध्ये अध्यक्षांच्या खोट्या स्वाक्षर्या करून, धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात फेरफार अर्ज दाखल केले. त्यांनी रतिलाल सुका राजकुळे यांना अध्यक्ष भासवून शिक्षक भरती प्रस्तावांवर अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षर्या करून सहा शिक्षकांची भरती केली. बनावट दस्तऐवजांच्या आधारावर शिक्षक मान्यता घेऊन शिक्षकांचे वेतनही काढले.
दरम्यान, हा प्रकार संस्थेचे अध्यक्ष महेंद्र देशमुख यांना लक्षात आल्यामुळे देशमुख यांनी अडावद पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाळासाहेब देशमुख, निवृत्त मुख्यध्यापिका मिना देशमुख, जिजाबराव देशमुख, रतिलाल राजकुळे, शांताराम कोळी, प्रमोद देशमुख, संदीप पाटील, रामकृष्ण पाटील, मनोज देशमुख, नंदकुमार देशमुख, विजय कोळी, मुख्याध्यापक अशोक कदम, निवृत्त मुख्यध्यापक सुभाष पाटील व शांताराम गवळे या १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अडावद स्थानाचे सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे हे करत आहेत.