चोपडा प्रतिनिधी । चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यापूर्वी परिसरातील शेतकर्यांशी चर्चा करण्याची मागणी सुकाणू समितीचे सदस्य एस.बी. पाटील यांनी केली आहे.
चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू होण्याच्या हालचाली आता दिसून येत आहेत. यामुळे दोन वर्षांपासून बंद असणारा कारखाना सुरू होण्याची शक्यता दुणावली आहे. मात्र हे सारे होत असतांना संचालकांनी शेतकर्यांशी चर्चा का केली नाही ? असा प्रश्न राज्य सुकाणू समितीचे समन्वयक संजय बी. पाटील यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात संजय पाटील यांनी म्हटले आहे की, चोपडा साखर कारखाना सुरू व्हावा ही शेतकर्यांची सुरुवातीपासून इच्छा आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी संचालक मंडळ सांगेल तसे व नेते सांगतील तसा ठराव करून देण्यात आला. शेतकर्यांनी कधी आडकाठी आणली नाही. परंतु हे होत असताना कारखाना चालवण्यास घेणार्यांसोबत प्रत्येक घटकाशी चर्चा झाली. मग शेतकर्यांसोबत चर्चा का होत नाही ? असे त्यांनी विचारल आहे.
यात पुढे म्हटले आहे की, सध्या कारखाना सुरू होत असल्याच्या सकारात्मक बातम्या येत आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. परंतु त्यांची एकच मागणी व प्रश्न आहे की आमचे पैसे कसे मिळतील? आणि या प्रश्नाचे उत्तर केवळ जे कारखाना घेणार आहेत तेच देऊ शकतात. संचालक मंडळ व नेते यांनी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कारखाना कोण घेत आहे, हे सारे वर्तमानपत्रात येत असल्याने लपून राहिलेले नाही. घेणारे लोक सज्जन आहेत, यात कुणालाही शंका नाही. पण ते येथे आले तेव्हा संचालक मंडळ व नेते यांच्यात बरीच चर्चा झाली. बँक पदाधिकारी, अधिकारी यांच्याशीही चर्चा झाली. अगदी कामगार बांधवांशीही अनौपचारिक चर्चा झाली. मात्र शेतकर्यांशीच चर्चा का करण्यात आली नाही याचे कारण कळू शकले नाही.
यामुळे चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू होत असल्याची बातमी ही आनंद दायक असली तरी याबाबत सुरू असलेल्या हालचालींबाबत शेतकर्यांशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे मत राज्य सुकाणू समितीचे सदस्य एस.बी. पाटील यांनी व्यक्त केले आहे.