वडधे येथील शेतकर्‍याची केळी इराणला रवाना

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडधे येथिल शेतकरी ईश्‍वरसिग पाटील यांची केळी इराण देशात निर्यात करण्यात आली आहे. ईश्‍वरसिग पाटील हे परदेशात केळी निर्यात करणारे तालुक्यातील पहिले शेतकरी ठरल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हात रावेर, यावल या तालुक्याना केळीचे आगर म्हटले जाते. याच प्रमाणे भडगाव तालुका देखिल केळीचे आगर आहे. कधी काळी गिरणा काठचा पट्टा केळी उत्पादनात अग्रेसर म्हणुन ओळखला जात होता. गत १० ते १५ वर्षा पुर्वी कजगाव येथिल रेल्वे स्टेशन वरुन केळीच्या वगन भरुन परप्रातांत केळी नेली जात होती. मात्र अलीकडच्या काळात केळी लागवडीत घट आलेली आहे. एके काळी जो शेतकरी कमीतकमी २५ ते ३० हजार केळी खोड लागवड करत होता तोच शेतकरी आता पाच ते दहा हजारच्या आत केळी खोड लागवड करत आहे. मात्र काही प्रगतीशील शेतकरी अतिशय दर्जेदार अशी केळीची लागवड करत आहेत. यात उपलब्ध साधन सामग्रीच्या बळावर भडगाव नगरपरीषद हद्दीतील वडधे (जुने) येथिल शेतकरी ईश्‍वरसिंग प्रतापसिंग पाटील यांनी मेहनतीच्या जोरावर, कोणतेही मार्गदर्शन न घेता शेतात केळीचे चांगले उत्पन्न काढत आहे.

ईश्‍वरसिंग प्रतापसिंग पाटील यांच्या कडे एकूण ६.५ एकर शेती आहे. बागायती उत्पादन काढण्यासाठी त्याच्या शेतात विहीर इलेक्ट्रिक मोटर आहे. ते दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात केळीची लागवड करत असतात. त्यांनी यावेळस दोन एकर क्षेत्रांत महालक्ष्मी नामक केळीच्या ४ हजार खोडांची लागवड केली आहे. हा माल काढणीला आलेला असताना पाचोरा येथिल व्यापारी इम्प्तीयाज शेठ यांनी ईश्‍वरसिग पाटील यांच्या शेतात येऊन मालाची पहाणी केली. केळीचा चांगला दर्जा पाहून त्यांनी येथील केळी इराण या देशात पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ईश्‍वरसिंग पाटील यांच्या शेतातील ३६५ केळीच्या खोडांची कटाई करत ९० क्विंटल माल योग्य त्या पध्दतीने पॅकींग करत इराणला निर्यात करून पाठविण्यात आला आहे.

ईश्‍वरसिंग पाटील यांच्या शेतातील केळी इराण येथे निर्यात केली जात असल्याची माहीती कानी पडताच परीसरातील शेतकरी, ग्रामस्थ यांनी ईश्‍वरसिग पाटील यांच्या शेताकडे धाव घेत पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. परीसरात ही बाब चर्चेचा विषय बनली आहे.

या संदर्भात ईश्‍वरसिंग पाटील म्हणाले की, गत २५ वर्षापासुन काळ्याआईच्या कुशीत मी माझ्या परीवारा सोबत घाम गाळत आहे. मी कियाशिल शेतकर्‍यांचे उत्पन्नाच्या बाबतीत अनेक प्रयोग ऐकले आहेत. माझेही एक स्वप्न होते. आपणही आपल्या शेतात काहीतरी प्रयोग करावा. त्याचे उत्पादन परप्रातांत, विदेशात पाठवावे. आज माझ्या शेतातील केळी व्यापारीच्या माध्यमातून इराण देशात जात आहे. याचा मला खुप आनंद असून ही एक प्रकारची स्वप्नपूर्ती असल्याचे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

Protected Content