चोपड्यात चोरीच्या 12 मोटारसायकली जप्त; तिघांना अटक

chopda choro karwai

चोपडा प्रतिनिधी । चोपडा शहर पोलिसांनी नियोजनबद्धरित्या केलेल्या धडक कारवाईत चोरीला गेलेल्या १२ मोटरसायकली हस्तगत केल्या असून तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. भविष्यातही अशीच सुरू राहील तसेच ज्यांच्या मोटरसायकली चोरीला गेलेले असतील त्यांनी यासंदर्भातल्या तक्रारी पोलिस स्टेशनला नोंदवाव्या व हस्तगत केलेल्या मोटर सायकलीपैकी आपल्या मोटरसायकली असल्यास रीतसर ओळख व कागदपत्र दाखवून त्या ताब्यात घ्याव्यात, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर वृत्त असे की, चोपडा शहर पोलीस स्टेशन नंबर ८१/२०१९ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हे.कॉ. जितेंद्र सदाशिव सोनवणे हे दि. 30 जून रोजी आझाद चौकात तीन जण त्यांचे ताब्यातील मोटरसायकलवर ट्रिपल सेट संशयितरित्या येताना दिसले. त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल थांबवून त्यांना पोलीस उपनिरीक्षक तुरनर यांनी कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्यांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस करता त्यांच्या ताब्यातील हिरो एचएफ डीलक्स ही गाडी चोरीची असल्याचे त्यांच्यातील चालक कमलेश उर्फ कमल बुधा डावर (रा. दिवाण्या ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) याने सांगितले. तसेच त्याच्यासोबतच्या दिलीप बारकू जाधव (बारेला), रामेश्वर उर्फ नाना शेवला जाधव (दोन्ही राहणार किरमला, ता. वरला जि. बडवानी मध्य प्रदेश) अशांना ३० जून रोजी सदर गुन्ह्यात अटक केली असता त्यांनी पोलीस रिमांड दरम्यान चोरून दिलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण 12 मोटरसायकली काढून दिल्या.

यांनी केली कारवाई
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सौरवकुमार अग्रवाल, पोनि विनायक लोकरे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि रामेश्वर तुरणार, पोहेकॉ जितेंद्र सदाशिव सोनवणे, पोहेकॉ सुनील पाटील, पोना जयदीप राजपूत, ज्ञानेश्वर जवागे, प्रदीप राजपूत, योगेश शिंदे, जितेंद्र चव्हाण, विलेश सोनवणे यांनी सदरची कारवाई केली आहे.

आत्तापर्यंत 40 दुचाकींची चोरी
गेल्या दोन वर्षात चोपडा शहर पोलीस स्टेशनला सुमारे 40 मोटरसायकली चोरीला गेल्या असल्याच्या नोंदीवरून पोलिसांनी पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, पोलीस अधिक्षक (चाळीसगाव) सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांचे सूचना व मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरणर गेल्या आठ दिवसात नियोजनबद्ध कारवाई केली.

Protected Content