जुन्या वादातून मुलाला मारहाण व धमकी !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एसटी वर्क शॉप परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका मुलाला शिवीगाळ करत मारहाण केली तर हातातील कड्याने डोक्याला मारून दुखापत केल्याची घटना मंगळवारी १ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २ जुलै रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, ईश्वर रमेश भटकर वय १७ रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हा मुलगा मंगळवारी १ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता शहरातील एसटी वर्क शॉपजवळून जात असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून मयुर चैत्राम जाधव रा, रामेश्वर कॉलनी, जळगाव याने शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर माझे नाव मयूर जाधव आहे असे पोलीसांना सांग मी घाबरत नाही व तुला पाहून घेईल अशी धमकी दिली. तसेच हातातील लोखंडी कडे डोक्यावर मारून दुखापत केली.

याप्रकरणी बुधवारी २ जुलै रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारा मयुर जाधव याच्या विरूध्द शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गणेशकुमार नायकर हे करीत आहे.