बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्रातील ऊर्जा विभागाच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कामगिरीचा लेखाजोखा देणाऱ्या ‘हंड्रेड डेज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वासराव पाठक यांनी हे पुस्तक लिहिले असून, राज्याच्या आगामी २५ वर्षांच्या ऊर्जा धोरणाच्या दिशेने उचललेल्या पावलांचा हा दस्तऐवज आहे.
ही पुस्तिका एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रकाशीत करण्यात आली. या वेळी ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघना साकोरे बोर्डिकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, उद्योग सचिव पी. अनबलगन, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., मुख्यमंत्र्यांच्या सचिव अश्विनी भिडे, एमएसईबी होल्डिंग कंपनीचे वित्त संचालक अनुदीप दिघे, तसेच स्वतंत्र संचालक आशिष चंदराणा आणि नीता केळकर उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांमध्ये ऊर्जा विभागाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि योजनांची अंमलबजावणी यामध्ये समाविष्ट आहे. महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तसेच, राज्याचा ऊर्जा परिवर्तन आराखडा तयार करण्यात आला असून, नवीकरणीय ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे.
प्रमुख कामगिरी:
शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ प्रभावीपणे राबवली
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत घरगुती सौर ऊर्जा प्रकल्पांच्या संख्येत वाढ
नवीन वीज कनेक्शन त्वरीत वाटप, अखंडित वीजपुरवठा व तक्रार निवारण यंत्रणा मजबूत
वीज उपकेंद्रांची आणि वितरण जाळ्याची क्षमता वाढवली
सरकारी कार्यालये सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय
ऊर्जा विभागाच्या अंतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि महाऊर्जा या कंपन्यांनी निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण केली. त्यामुळेच ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसांच्या यशाचा रिपोर्ट कार्ड प्रकाशित करणारी महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना ठरली आहे.