धरणगाव (प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त आज दुपारी धरणगावात दाखल झालेत. यावेळी अवघे १० मिनिट मुख्यमंत्री थांबले. परंतू याच दरम्यान, चोरट्यांनी त्यांना चांगलीच सलामी दिली. चोरट्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला आलेल्या नागरिकांचे खिसे कापले, मोबाईल लांबविले. तर दुसरीकडे शहरातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा खंडित ठेवत महावितरणनेही महा जनादेश यात्रा धरणगावकरांसाठी स्मरणीय केली. दरम्यान, या संदर्भात कोणतीही तक्रार अद्याप पोलिसात दाखल नाहीय.
या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची महा जनादेश यात्रा धरणगाव शहरातील शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी भाजपचे पदाधीकारींसह सर्व सामान्य नागरिक देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे शिवाजी महाराज चौकात मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी ५ ते ८ जणांचे खिसे कापले. कुणाचे दोन कुणाचे पाच हजार असे साधारण ५० हजाराची रोकड गेल्याचे कळते. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी ७/८ मोबाईल देखील लांबविले आहेत. दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या संदर्भात कोणतीही तक्रार अद्याप दाखल नाहीय.
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा दौरा असतानाही शहरातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा खंडित होता. सकाळी ११ वाजेपासून काही भागात लाईट नव्हती. कारण मुख्यमंत्री हे मोठ्या लक्झरी गाडीवर उभे राहून अभिवादन स्वीकारतात किंवा भाषण करतात. त्यामुळे उंचीवर असणारी विद्द्यु तार महावितरणने काढून घेतली होती. त्यामुळे सकाळपासून शहरात विद्युत पुरवठा खंडित असल्याचे कळते. परंतु याबाबत महावितरणकडून अधिकृत कुणीही माहिती दिली नाही. त्यामुळे नागरिकांना उकाड्याने हैराण केले होते. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु मुख्यमंत्र्याच्या दौर्यानिमित्त काही ठिकाणी तारा बदलविण्यात आल्या. परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित असल्याचे कळते.