जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज जळगाव जिल्हा दौर्यावर येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज जळगाव विमानतळावर प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुक्ताईनगर आणि जळगावात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आधी ते वाशीम येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. या अनुषंगाने मुंबई येथून खास विमानाने एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर दुपारी बाराच्या सुमारास आगमन झाले. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधिक्षक रेड्डी, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील आदी मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
दरम्यान, वाशीम येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री हे पुन्हा जिल्ह्यात येणार असून ते पहिल्यांदा मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढोळदा येथील पुलाचे भूमीपुजन करून कार्यक्रमात उपस्थिती देणार आहेत. यानंतर त्यांच्या हस्ते जळगावातील खेडी येथील वारकरी भवनाचे भूमिपुजन करण्यात येणार आहे.