नवी दिल्ली, प्रतिनिधी | आयएनएक्स मीडियाप्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आजही कोर्टात दिलासा मिळाला नाही. चिदंबरम यांना येथील राउज एव्हेन्यू संकुलातील कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांची पुन्हा २ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
चिदंबरम चौकशीत सहकार्य करत नाहीत, असमाधानकारक उत्तरे देतात. त्यामुळे या प्रकरणातील अन्य आरोपींची व त्यांची समोरासमोर चौकशी करावी लागणार आहे, असे नमूद करत सीबीआयने चिदंबरम यांची कोठडी पाच दिवसांनी वाढवण्याची मागणी केली. त्यावर तुम्ही प्रत्येकवेळी पाच दिवसांची कोठडी वाढवून का मागत आहात. एकदाच १५ दिवसांची कोठडी का मागत नाही, अशी विचारणा कोर्टाने सीबीआयला केली.
दरम्यान, चिदंबरम यांना चौकशीदरम्यान ४०० प्रश्न विचारण्यात आल्याचा दावा, त्यांच्या वकिलांनी केला आहे. चिदंबरम यांना अटक करण्यात आल्यानंतर आधी २६ ऑगस्टपर्यंत व नंतर ३० ऑगस्टपर्यंत त्यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. तिथे त्यांना २ सप्टेंबरपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. दुसरीकडे चिदंबरम यांनी सीबीआय कोठडीला सुप्रीम कोर्टात न्या.आर. भानुमती आणि न्या.ए.एस. बोपन्ना यांच्या पीठापुढे आव्हान दिले आहे. चिदंबरम यांच्या या अर्जावर २ सप्टेंबर रोजीच सुनावणी घेण्यात येईल, असे कोर्टाने नमूद केले आहे.