अनेक महिने कोरोना आजाराची लक्षणे आढळतात

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था| कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांमध्ये अनेक दिवस, महिने आजाराची लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे बाधिताला पूर्णपणे कधी बरे वाटेल, याबाबत सांगण्यास तज्ज्ञांना अवघड जात आहे.

ज्या रुग्णांमध्ये आजाराची किरकोळ लक्षणे दिसतात असे रुग्ण लवकरच आजारातून मुक्त होत आहेत. परंतु वृद्ध आणि गंभीरपणे संसर्गबाधित रुग्णांना आजारातून बरे होण्यास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागत असल्याचे समोर आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सामान्यत: दोन आठवड्यांपासून ते सहा आठवड्यांपर्यंत बाधित बरे होतात. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, सौम्य लक्षणे असणार्‍या ज्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही, अशा रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांमध्येही जवळपास दोन आठवड्यानंतरही आजाराची लक्षणे दिसून आली होती.

इटलीमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ८७ टक्के रुग्णांमध्ये संसर्गाची बाधा झाल्यानंतरही दोन महिने थकवा आणि श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. शिकागोमधील फुफ्फुसांच्या आजाराचे तज्ज्ञ डॉ. गेट्स यांनी सांगितले की, अनेक बाधितांमध्ये चार महिन्यानंतरही आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. कोणता रुग्ण पूर्णपणे बरा होईल हे सांगणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. तर, गंभीर आजारातून तुम्ही बाहेर पडला असलात तरी पूर्णपणे स्वस्थ असालच असे समजण्याचे काहीही कारण नसल्याचे संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. जय वार्के यांनी सांगितले.

Protected Content