छत्रपती शिवरायांनी त्याकाळी ईडीसारखी सक्त वसूली केली होती : स्वामी गोविंददेव महाराज

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती तर सूरतेवर स्वारी केली होती, आपल्या बापाला आपण लुटारू कसे काय म्हणू शकतो? असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यावर जोरदार आक्षेप घेत, ऐतिहासिक दाखले देण्याची स्पर्धा सुरू झाली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवरायांनी खंडणी मागितली होती, असे विधान केले. यावर वाद-प्रतिवाद सुरू असतानाच आता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी छत्रपती शिवरायांच्या सूरत लुटीबाबत वेगळेच विधान केले आहे.

“संपूर्ण राज्य हिंदूंचे आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराज कार्य करत होते. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान जेव्हा महाराजांना आर्थिक चणचण भासत असे आणि अशावेळी कुठलाही उपाय दिसत नसे. तेव्हा आज ज्याप्रकारे ईडी सक्तीची वसुली करते. त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी काही लोकांकडून सक्तीची वसुली केली. हिंदवी स्वराज्यासाठी जो कर भरायला हवा होता, त्याची महाराजांनी सक्तीची वसुली केली”, असे मत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले आहे. आज गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळाला भेट दिली असता एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी हे विधान केले आहे.

Protected Content