छत्रपती शिवाजींचे आरमार सुरक्षेची शाश्वती देणारे होते – रघुजीराजे आंग्रे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन पोर्तुगीजांना हाताशी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यापारासाठी बोट बांधणीला सुरुवात केली. पोर्तुगीज आज ना उद्या दगा देतील म्हणून राज्यातील तज्ञ सुतारांनी ते ज्ञान आत्मसात केले. तीरकामठे,भाले, दोन अडीच फुटांच्या तलवारीच्या जोरावर महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. महाराजांचे आरमार इतकं सक्षम होतं की, रयतेच्या रक्षणासोबतच परदेशी व्यापाऱ्यांना सुरक्षेची शास्वती देणारं होतं. आरमारामुळेच स्वराज्य आणि स्वराज्याच्या बाजारपेठा समृद्ध झाल्या, असे प्रतिपादन श्री. छत्रपती शिवाजीराजे रायगड मेमोरीयल मंडळ, पुणे येथील अध्यक्ष तथा अभ्यासक रघुजीराजे आंग्रे यांनी केले.

जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालय, जळगांव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केशवराव भोईटे व्याख्यानमालेचे अंतर्गत शुक्रवारी दि. १६ रोजी व्याख्यान संध्याकाळी भय्यासाहेब गंधे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी रघुजीराजे आंग्रे हे बोलत होते. प्रसंगी मंचावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, शिवाजीराव केशवराव भोईटे, प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख उपस्थित होते. सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत केशवराव भोईटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.

प्रस्तावनेतून प्राचार्य डॉ. देशमुख यांनी, व्याख्यान घेण्यामागील उद्देश स्पष्ट करीत केशवराव भोईटे यांच्या स्मृतींनाही उजाळा दिला. राजेंद्र नन्नवरे यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर “स्वराज्याचे आरमार” या विषयावर व्याख्याते रघुजीराजे आंग्रे यांनी उपस्थित शिवप्रेमी नागरिकांना विविध दाखले देऊन माहिती दिली. शिवाजी महाराज यांचे नेतृत्वगुण वाखाणण्याजोगे होते. त्यांनी स्वराज्य उभारताना सर्व घटकांचा विचार केला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रिय स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती, असे आंग्रे यांनी सांगितले.

परकीय आक्रमण करणाऱ्यांना तोंड द्यायचे असेल आणि आपलं सार्वभौम अबाधित ठेवायचं असेल तर आरमार पाहिजे, हे शिवाजी महाराजांनी ओळखले होते. त्यामुळे १६५७ मध्ये त्यांनी आरमाराचा पाया घातला, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन व आभार पल्लवी शिंपी यांनी मानले. यशस्वीतेसाठी नूतन मराठा महाविद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content