यावल प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावे तितूर नदीला आलेल्या महापुरामुळे पाण्याखाली गेली, ज्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. या पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकी म्हणून छत्रपती मराठा साम्राज्य अर्थात सीएमएस ग्रुपतर्फे मदत मोहिम राबविण्यात येत आहे.
सी. एम. एस. खान्देश ऍडमिन टीम सह ३०+ अधिक खान्देश ग्रुप मधील ५०००+ सदस्यांनी जीवनावश्यक वस्तू स्वरूपात मदत केली, तर काहींनी आर्थिक स्वरूपात मदत केली. सी.एम.एस. संघटनेच्या खान्देश मधील पदाधिकाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन अनेक कुटुंबास महिनाभर पुरेल अश्या पद्धतीने जीवनावश्यक किट तयार करून त्याचे वाटप केले. प्रत्येक किट मध्ये १ किलो तेल, २ किलो तांदूळ, १ किलो तूर डाळ, १ किलो साखर, १ किलो मीठ, २५० ग्रॅम शेंगदाणे, २ ५० ग्रॅम चहा पावडर, ५०० ग्रॅम मिरची चटणी, २०० ग्रॅम हळद, २०० ग्रॅम मिरची मसाला, १०० ग्रॅम खिचडी मसाला, २०० ग्रॅम जिरे, कोलगेट टूथपेस्ट, पॅराशूट हेअर ऑइल, लाईफ बॉय साबण 1 पॅक, बाजार बॅग 1, Pracitamol पॅकेट 1, ORS पॅकेट इ. साहित्याचा समावेश होता.
याकार्यात खान्देश सी.एम.एस. टीम चे पदाधिकारी जितेंद्र पवार, शिवाजी पाटील, सौ. कविता शिवाजी पाटील, संदीप पाटील, पंकज पाटील, उदयराम पाटील, गौरव चव्हाण, सचिन पाटील, जितेंद्र पाटील दिपक चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली. एकूण ५०+ कुटुंबांना एक महिन्याचा किराणा सामान तर १००+ जणांना टॉवेल, चटई यांचे वाटप हे चाळीसगाव तालुक्यातील मजरे, वाकडी, कोंगा नगर, जावळे या गावांमध्ये रविवार ५ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले.
मुख्य रस्त्यावरील गावे सोडली तर अजूनही बऱ्याच आतल्या भागात मदत पोहचली नसल्याचे सी.एम.एस. पदाधिकाऱ्यांनी सांगितले, यास्तव फक्त मुख्य गावांपुरते मर्यादित न राहता उपेक्षित गावांना देखील मदत करण्याचे आवाहन करत, सामाजिक कार्यात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्व सभासदांचे CMS – छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेचे संचालक जितेंद्र पवार, धनराज भोसले, ओंकार देशमुख ह्यांनी आभार मानले.