मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने नुकताच तिसरी ते बारावी वर्गाचा अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावा, अशी शिफारस केली आहे. त्यानंतर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीची श्लोक शिकवले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावरुन विविध राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संभाजी ब्रिगेडकडून मनुस्मृतीचे श्लोक शिकवण्यास विरोध केला आहे. आता महायुतीतूनही विरोधी सूर ऐकायला लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आमच्या विचारधारेला हे मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. समता परिषदेच्या विचारधारेशी मनुस्मृती विसंगत आहे. आमच्या विचारधारेत ते बसत नाही. यामुळे शालेय अभ्यासक्रमात ते लागू करण्यास आमचा विरोध असणार आहे, असे छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विनाकरण संभ्रम निर्माण केला जात असल्याचे म्हटले आहे.