
मुक्ताईनगर,-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आई-वडिलांविषयीची अतुट नाळ आणि त्यांच्यावरील संस्कारांची जपणूक कशी करावी, हे सांगणारे ‘मायेची सावली’ हे पुस्तक सध्या वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. लेखक छबिलदास ज्ञानेश्वर पाटील यांनी हे पुस्तक केवळ लिहिले नसून, आपले विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे ते एक संस्कारशील व्यक्तिमत्व आहेत. या पुस्तकातून त्यांनी आई-वडिलांचे महत्त्व, त्यांचे ऋण आणि आपली नैतिक जबाबदारी यांचा अत्यंत हृदयस्पर्शी आणि विचारप्रवर्तक शैलीत ऊहापोह केला आहे.

या पुस्तकातून ‘वृद्धाश्रम संस्कृती: विचारमंथन’, ‘आई-वडिलांचा सन्मान — जिवंतपणी की मेल्यावर?’, ‘हातातला मोबाईल श्रेष्ठ की आईबाप?’, ‘चार दिवे… पण उजेड नाही!’ तसेच ‘बाप: मूक वेदनांचा अभंग गायक’ यांसारख्या प्रभावी प्रकरणांमधून आजच्या सामाजिक वास्तवावर भाष्य केले आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ एक साहित्यिक कृती नसून, संस्कारांचा आणि कर्तव्याचा एक जिवंत दस्तऐवज आहे. नव्या पिढीला आई-वडिलांविषयी आदर, कृतज्ञता आणि जबाबदारी शिकवण्यासाठी हे पुस्तक एक प्रेरणादायी माध्यम ठरू शकते.
‘मायेची सावली’मधील विचार अधिक व्यापक पातळीवर पोहोचावेत यासाठी राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये या विषयावर आधारित कार्यक्रम सादर करावेत, अशी मागणी अनेक वाचकांकडून होत आहे. मुलांमध्ये लहानपणापासून मातृपितृभक्तीचे संस्कार रुजवण्याचा हेतू या मागणीमागे आहे. एका वाचकाच्या मनोगतातून उमटलेले “आई-वडिलांचे अस्तित्व जपा, कारण त्यांच्याशिवाय जीवनात उजेड असतो, पण ऊब नसते” हे शब्द आजच्या स्वार्थी युगात सत्य सांगणारा आरसाच आहे. हे पुस्तक समाजात वाढणाऱ्या वृद्धाश्रम संस्कृतीविरोधात एक बुलंद आवाज ठरू शकते. आई-बाबा हे केवळ नाते नाही, तर जीवनाचा आधार आहेत, हे सांगणारे हे पुस्तक प्रत्येक तरुणाने वाचावे अशी अपेक्षा आहे. लेखक छबिलदास पाटील यांनी “हे लिखाण समाजाच्या हृदयाला स्पर्श करत असेल, तर त्यापेक्षा मोठे समाधान काहीच नाही,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.



