पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात सिंधी समाजाचा आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांची जयंती ‘चेट्री चंड्र सिंधी दिवस’ म्हणून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील ओत्तार गल्लीतील समाज मंदिरात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून या दिवसाचे विशेष महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या निमित्ताने सकाळी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. भक्तिमय वातावरणात झालेल्या या विधींमुळे परिसरात आध्यात्मिकतेची अनुभूती निर्माण झाली. दुपारी धुळे येथील समाजाचे दौलत महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजा करून पवित्र अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली, ज्यामध्ये समाजबांधवांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला.

यानंतर संपूर्ण सिंधी समाजासाठी महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला होता. समाजातील एकोप्याचे दर्शन घडवत सर्वांनी या प्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, या दिवशी शहरातील सिंधी समाजाच्या प्रतिष्ठानांनी आपली दुकाने बंद ठेवून सणाचे महत्त्व अधोरेखित केले. सायंकाळी माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आमदार अॅड. अमोल पाटील, नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक आणि शहरातील पत्रकारांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
सायंकाळी पाच वाजता ओत्तार गल्लीतील समाज मंदिरापासून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक होळी चौक, नगर परिषद चौक, जुने पोस्ट ऑफिस चौक आणि बाजारपेठ मार्गे बोरी नदीच्या किनारी पोहोचली. येथे पवित्र ज्योतीचे विसर्जन करून संपूर्ण विश्वात सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशी प्रार्थना करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान ‘जय झुलेलाल’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जय झुलेलाल सिंधी पंचायत आणि जय झुलेलाल नवयुवक मित्र मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवून कार्यक्रम शांततेत पार पाडला.



