चंदीगड | कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्या राजीनाम्यानंतर आज चरणजित सिंग चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली.
याबाबत वृत्त असे की, शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर चरणजित सिंग चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्यात आली. रविवारी दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर कॉंग्रेस नेृतव्वाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड यांच्या नावांची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चेत सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव होतं. मात्र, या सर्व नेत्यांना डावलून पंजाबमधील दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी कॉंग्रेसकडून देण्यात आली आहे. ते पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री झाले आहेत.
चरणजित सिंग चन्नी विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी मंत्री म्हणून तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण, रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण आणि पर्यटन आणि संस्कृती व्यवहार विभागाची जबाबदारी सांभाळली होती. यानंतर आता त्यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.