चर्मकार विकास संघाच्या वधू-वर परिचय मेळाव्यास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चर्मकार विकास संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जळगाव येथे आयोजित तृतीय राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. या मेळाव्यास समाजबांधवांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून तब्बल ५३५ वधू-वरांनी आपला परिचय सादर केला. सामाजिक एकात्मता, संस्कार आणि नव्या पिढीच्या प्रगतीचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

हा मेळावा रविवार, २ नोव्हेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटजवळ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू मामा भोळे, संस्थापक प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, माजी महापौर व जिल्हा शिवसेना प्रमुख विष्णू भंगाळे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला सामाजिक ऐक्याचा नवा उर्जा स्पर्श मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. या मेळाव्यात ‘ऋणानुबंध’ या डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, ज्यातून विवाह क्षेत्रात आधुनिकतेच्या दिशेने समाजाची वाटचाल अधोरेखित झाली.

या मेळाव्यात विवाहित, घटस्फोटित, विधवा-विधुर आणि अपंग वधू-वरांनीही सक्रिय सहभाग घेतला. सर्व वधू-वरांना आपला परिचय देण्याची सुवर्णसंधी मिळाली, ज्यामुळे समाजात परस्पर संवाद आणि विश्वास वाढण्यास मदत झाली.

मान्यवरांनी या उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक करत, गुरु रविदास महाराजांचा भव्य पुतळा आणि सभागृह बांधणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे, अॅड. डॉ. अर्जुन भारुडे, प्रकाश रोजतकर, कमलाकर ठोसर, राजेश वाडेकर, मनोज सोनवणे, ज्योती निंभोरे, गणेश काकडे, गजानन दांडगे, संदीप ठोसर, योगिता वानखेडे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय वानखेडे, प्रा. धनराज भारुडे आणि डॉ. संजय भटकर यांनी केले, तरअॅड. डॉ. अर्जुन भारुडे यांनी आभार मानले.