मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या फोन टॅपींग प्रकरणात तब्बल ७५० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यात अनेक धक्कादायक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
खासदार संजय राऊत, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे फॉन टॅप करण्यात आल्याच्या प्रकरणी कुलाबा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात तब्बल साडे सातशे पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रानुसार एकनाथराव खडसे यांच्या दोन मोबाइल क्रमांकांचे २१ जून २०१९ ते १७ ऑगस्ट २०१९ या कालावधीत बेकायदा टॅपींग करण्यात आले. राऊत यांच्या एका मोबाइलचे दोन वेळा टॅपींग करण्यात आले होते. ७ नोव्हेंबर, २०१९ ते १४ नोव्हेंबर, २०१९ व १८ नोव्हेंबर, २०१९ ते २४ नोव्हेंबर, २०१९ या दोन कालावधीत राऊत यांचा मोबाइल टॅपींगसाठी राज्य गुप्तवार्ता विभागाकडून ठेवण्यात आला होता.
एकनाथराव खडसे यांच्या मोबाइल संदेश रेकॉर्डींगसाठी विशेष कारण देण्यात आले नव्हते. मात्र राऊत यांच्या मोबाइलचे टॅपींग करण्यासाठी सार्वजनिक सुरक्षेला बाधा तसेच समाज विघातक कृत्यामध्ये सहभाग, सामाजिक सुरक्षा अशी कारणे देण्यात आली होती. राऊत यांच्या मोबाइल अभिवेक्षणासाठी ४१९ या विशेष अधिकाराचा वापर करण्यात आल्याचेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान,या प्रकरणातील प्रमुख संशयित रश्मी शुक्ला यांचा आरोपपत्र दाखल करण्याआधी जबाब घेण्यात आला असता त्यांनी अनेक प्रश्नांना थेट उत्तरे टाळल्याचे दिसून आले. रश्मी शुक्ला यांच्यासाठी मुंबई पोलिसांनी एक प्रश्नावली तयार केली होती. त्यात बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षणात तुमचा सहभाग आहे का? त्याला हो अथवा नाही, असे थेट उत्तर न देता अभिवेक्षण हे मुख्य गुप्तवार्ता अधिकारी याचे काम असल्याचे उत्तर दिल्याचे सूत्रांनी सांगितले. इतर प्रश्नांनाही त्यांनी स्पष्ट उत्तरे दिली नसल्याची माहिती पोलीस खात्याच्या सूत्रांनी दिली आहे.
खरं तर, तत्कालीन मुख्य सचिव संजय कुमार यांनी लोकप्रतिनिधींचे मोबाइल टॅपींग ठेवायचे नाहीत, असे सक्त आदेश दिले होते. त्यामुळे राऊत व खडसे यांचे मोबाइल क्रमांक एस रहाटे व खडसने या नावांनी टॅपींगसाठी ठेवण्यात आले होते. पण हे क्रमांक संजय राऊत व एकनाथराव खडसे यांचे असल्याचे एका साहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांच्या लक्षात आले होते. त्या साहाय्यक पोलीस आयुक्तांनी दोन वेळा शुक्ला यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. आरोपपत्रामध्ये या अधिकार्यांचा जबाबही समाविष्ट करण्यात आला आहे.