पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकान चालविले जात आहे. मात्र या स्वस्त धान्य दुकानात अनेक दिवसांपासून अनागोंदी कारभार सुरू असुन लाभार्थींचे अंगठे घेवुन देखील धान्य मिळत नसल्याने संतप्त लाभार्थींनी थेट तहसिल कार्यालय गाठुन संबंधित वि. का. सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे..
पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक गावातील स्वस्त धान्य दुकानाच्या बाबतीत प्राधान्य व अंतयोदय लाभार्थींची लुट व पिळवणुक होत असून यापूर्वी आम्ही आपणांस लेखी पत्र व आदिवासी महिला इंदिरानगर, यांचा तक्रारी अर्ज दक्षता समिती लोहारी बु” यांनी दाखल केलेला आहे. परंतु सदर पत्रास आपल्या कार्यालयाकडून केराची टोपली दाखविण्यात आलेली असून अद्यापपावेतो कसलीही चौकशी झालेली नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार यांचे चांगभले होत असून आपण जाणीवपुर्वक सदर तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहात असे आमचे लक्षात आले आहे. सदर दुकानाचे बाबतील ४ ते ५ महिन्यापासुन असंख्य तक्रारी असून सदर तक्रारीच्या बाबतीत आजपावेतो कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. अन्न सुरक्षा योजनेमार्फत अंतोदय लाभार्थी यांना ३५ किलो धान्य देण्याचे शासन निर्णय असतांना प्रत्यक्षात इंदिरा नगर आदिवासी महिलांना २० किलोच माल देण्यात येतो. व आदिवासी वस्ती ते धान्य दुकान हे दिड किमी अंतर असून त्यांना ३-४ वेळेस धान्य दुकान ते आदिवासी वस्ती असे हेलफाटे मारावे लागतात. सदर प्रकरणी आपल्या कार्यालयावरुन ३५-४० आदिवासी महिलांना समक्ष येवून तक्रार दाखल केली आहे. परंतु आपण याबाबतीत कोणतीही चौकशी केलेली नाही. तसेच प्राधान्य लाभार्थ्यांना प्रती युनीट ५ किलो माल देण्याचे नियम असतांना प्रत्यक्ष ४ किलो माल देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय असतांना कमी धान्य वाटप करण्याचे धोरण काय, चालु महिन्याचे धान्य वितरण करतांना सदर वि. का. सोसायटी दुकान यांनी किळसवाणा प्रकार केला असून गहुचे वाटप बंदच करण्यात आले आहे. ई-पासिंग मशीनला धान्य लोड केलेले असतांना तहसिलदार पाचोरा यांनी गहुचा पुरवठा केला नाही. असे उत्तर लाभार्थ्यांना दिले जात असून त्यांना ई-पास द्वारे खोटे बील देण्यात येत आहे. त्यामुळे ई-पासला माल असतांनाही पुर्ण या महिन्याचे गहुचे वाटप यांनी केलेले नाही. व लाभार्थ्यांचा अंगठा घेतांना ३० तारखेच्या आत अंगठा दया, तरच तुम्हांला ३० तारखेनंतर आम्ही गहुचा पुरवठा करु असे सांगितले जात आहे. धान्याचा पुरवठा हा आमच्या माहितीनुसार तहसिलदार पाचोरा यांनी केला असून त्यानुसार ई-पास मशिनमध्ये धान्याचा पुरवठा दिसत आहे. प्रत्यक्षात वि का सोसायटीच्या धान्याचे दुकानात माल/गोदामात दिसत नाही. त्यामुळे या महिन्यात गहु कोठे गेला याची चौकशी करुन गोरगरीबाचे धान्य खाणारे यांचेवर तात्काळ गुन्हा दाखल करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन लोहारी बु” ग्रामपंचायतीच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले आहे. सदरचे निवेदन निवासी नायब तहसिलदार विनोद कुमावत यांनी स्विकारले.