Home क्रीडा चांगदेवच्या अंकुश चौधरींची उत्तुंग भरारी: बनले ‘खानदेश हिट्स’ बास्केटबॉल संघाचे मालक!

चांगदेवच्या अंकुश चौधरींची उत्तुंग भरारी: बनले ‘खानदेश हिट्स’ बास्केटबॉल संघाचे मालक!


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिक्षण संस्था आणि बोदवड बाजार समितीचे संचालक म्हणून राजकारणात आपले नाव प्रस्थापित केलेले श्री. अंकुश राजेंद्र चौधरी यांनी आता क्रीडा क्षेत्रातही एक नवा अध्याय लिहिला आहे. पुणे-खराडी येथे सुरू असलेल्या ‘एबीसी प्रो बास्केटबॉल सीझन ४’ (ABC Pro Basketball Season 4) मध्ये त्यांनी ‘खानदेश हिट्स’ (Khandesh Hits) या बास्केटबॉल संघाची मालकी (स्पॉन्सरशिप) स्वीकारली आहे. त्यांच्या या यशामुळे चांगदेव आणि संपूर्ण खानदेशासाठी ही एक अभिमानाची बाब ठरली आहे.

या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून मातब्बर संघ सहभागी झाले आहेत. ‘मुंबई टीम’चे सदानंदजी सुळे, ‘अहिल्या नगर’चे रोहित पवार, ‘मुंबई बेअर्स’चे शशांक गोयंका आणि ‘पुणे’चे इंद्रनील चितळे यांसारख्या नामांकित आणि दिग्गज व्यक्तींच्या संघांमध्ये अंकुश भाऊ चौधरींसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या व्यक्तीने इतकी उंच झेप घेणे निश्चितच कौतुकास्पद आहे. एका छोट्याशा चांगदेव गावातून आणि ग्रामीण भागातून जाऊन, एवढ्या मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या संघांसोबत सहजपणे वावरणे हा त्यांचा आत्मविश्वास आणि दूरदृष्टी दर्शवतो.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांची उपस्थिती ही या आयोजनाची भव्यता अधोरेखित करते. अंकुश चौधरी यांनी राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानासोबतच आता क्रीडा क्षेत्रातही आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या पावलामुळे केवळ खानदेशातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि त्यांना मोठ्या मंचावर येण्याची संधी मिळेल अशी आशा आहे. ही केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण खानदेशाची अभिमानास्पद कामगिरी आहे.


Protected Content

Play sound