चंदूभाऊ, तुम्हाला दुसरी संधी पक्की !: ज्येष्ठांचा भरभरून आशीर्वाद


बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चंदूभाऊ तुम्ही ज्या संघर्षातून कामे करत आहात, ते आम्ही पाहत असून यंदा देखील तुम्हालाच संधी मिळणार ! अशा शब्दांमध्ये तालुक्यातल्या ग्रामीण भागातील ज्येष्ठांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना भरभरून आशीर्वाद दिले.

मुक्ताईनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांनी तिन्ही तालुक्यांमध्ये झंझावाती प्रचार सुरू केला असून याला मतदारांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. आज त्यांनी बोदवड तालुक्यातील मनूर, चिखली, शेवगे बुद्रुक, वडजी, जामठी, येवती व रेवती या गावांमध्ये प्रचार फेरी काढली. यात ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले. तरूणाईने त्यांचे जल्लोषात स्वागत केले, तर ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद दिले.

दरम्यान, आमदार पाटील यांनी संवाद साधतांना आपण जनतेच्या आशीर्वादावर विजय संपादन केला असून आता देखील केलेल्या कामांच्या शिदोरीवर पुन्हा कौल मागत असल्याचे सांगितले. ज्यांनी 30 वर्षात काही केले नाही, ते आज खूप काही केल्याचा आव आणत असले तरी त्यांची केविलवाणी धडपड ही आपल्या सर्वांना दिसून येत असल्याची टिका त्यांनी केली. तसेच, आगामी पंचवार्षिकमध्ये आपण उर्वरित कामे पूर्ण करून मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने सुजलाम-सुफलाम करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी याप्रसंगी दिली.

आजच्या प्रचार फेरीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत शिवसेना, भाजप, रिपाइं (आठवले गट ) तसेच मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.