मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि नंतरच्या घडामोडी घडल्या असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला याबाबत काहीही माहित नसल्याचे आज सांगितले आहे.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा मोठा गट घेऊन भाजपला जाऊन मिळणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. कालच त्यांनी सूचकपणे आपल्याला पूर्ण पाठींबा असल्याचे आपल्या समर्थक आमदारांना सांगितले होते. या पार्श्वभूमिवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर काहीही भाष्य करणे टाळले आहे.
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच आपल्याला जे काही सुरू आहे, त्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आपल्याला काहीही माहित नाही. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबतही त्यांनी काहीही भाष्य करण्यास नकार दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेतील बंडाळीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. चंद्रकांत पाटील यांनी आज देखील यावर चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे.