छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गद्दारांना धडा शिकवण्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. २५ जुलै रोजी शिवशंकर कॉलनीत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांचे कीर्तन झाले. या वेळी आपण अजूनही रेसमध्ये आहोत हे खैरे यांनी दाखवून दिले. विशेष म्हणजे पक्षाबाहेरच्या गद्दारांबरोबर पक्षांतर्गत गद्दारांकडेदेखील त्यांचा रोख असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
खैरे यांचा लोकसभेत पराभव झाला होता. त्यामुळे ते राजकीयदृष्ट्या बॅकफूटवर गेले होते. या पार्श्वभूमीवर खैरे यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. माझी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मला गद्दारांना पाडायचे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास मी संजय शिरसाट यांना पाडण्यासाठी निवडणूक लढवेन, असे ते म्हणाले.