मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ”राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची विधानपरिषद निवडणुकीत संधी असून यात महाविकास आघाडीला यश लाभणारच” असा आशावाद राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथराव खडसे यांनी आज व्यक्त केला आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्यास काही मिनिटे बाकी असतांना एकनाथराव खडसे हे विधीमंडळाकडे रवाना झाले. याप्रसंगी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील हे होते. प्रसारमाध्यमांशी बोलतांना खडसे यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा आशावाद व्यक्त केला.
एकनाथराव खडसे म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची मोठी संधी या निवडणुकीत असून मविआ यात यशस्वी होईल असा आपल्याला विश्वास आहे. भाजपच्या काही आमदारांचे आपल्याला मत मिळणार काय ? याबाबत ते म्हणाले की, भाजपमधील अनेक नेत्यांनी आपले संबंध आहेत. मात्र पक्षाची भूमिका सोडून ते आपल्याला मतदान करतील असे काही वाटत नाही. तथापि, त्यांची मते मिळाली नाहीत तरी देखील या निवडणुकीत आपल्यासह मविआच्या सर्व उमेदवारांचा विजय होणार असल्याचा आशावाद एकनाथराव खडसे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.