दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. ते ३० ऑगस्ट रोजी रांची येथे भाजपमध्ये प्रवेश घेतील. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या देशातील एक प्रतिष्ठित आदिवासी नेते चंपाई सोरेन यांनी काही काळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
चंपाई सोरेन यांच्या भाजप प्रवेशामुळे झारखंडचे मुख्यमंत्री व झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांना मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी चंपाई सोरेन यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. संघर्ष करून नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या कालावधीत वाटेत कोणताही मित्र भेटला तर त्याच्याशी हस्तांदोलनही करतो, असेही चंपाई सोरेन यांनी सांगितले. त्यामुळे कदाचित ते भाजपसोबत युती करतील, असे वाटत होते.