चाळीसगाव प्रतिनिधी । येथील खरजई रोडवरील स्मशानभूमीत शवदाहिनी बसविण्यात यावी अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा तेली समाज युवा मंचने दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील खरजई रोड येथील सर्वात मोठ्या स्मशानभूमीतील शवदाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. यामुळे अंत्यविधीसाठी आणलेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांची दुरुस्ती किंवा नवीन शवदाहिनी बसवण्याच्या मागणीसाठी तेली युवा मंचचे अनिल चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनाचा इशारा पालिका प्रशासनाला दिला होता. त्यानंतर ह्या समस्येची त्वरित दखल घेत लवकरच अमरधाम येथे नवीन शवदाहिनी बसवण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही शवदाहिनीची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे.
शवदाहिनी बसवण्याबाबत पालिकेच्या वतीने निविदाही प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रश्न लवकर निकाली निघेल, अशी अपेक्षा शहर वासीयांकडून व्यक्त केली जात होती. परंतु निविदा निघून एक महिना लोटला. परंतु शवदाहिनीचे काम अद्याप मार्गी लागले नाही. नागरिकांनी आणखी किती दिवस त्रास सहन करावयाचा असा प्रश्न तेली समाज युवा मंचचे अध्यक्ष चौधरी यांनी उपस्थित केला. नवीन शवदाहिनी बसवण्याबाबत वारंवार निवेदने देऊनही त्यांची दुरुस्ती अथवा नवीन बसवण्यात न आल्याने नगरपालिका प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा तेली समाज युवा मंचचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिला आहे.