चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील तळेगाव शेत शिवारात अवैधरीत्या गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून मुद्देमालासह हातभट्टी उध्वस्त केली असून याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. शहारासह ग्रामीण भागात कलम १४४ प्रमाणे संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना तालुक्यातील तळेगाव येथील शेत शिवारात अवैधरीत्या गावठी दारूची हातभट्टी तयार करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. लागलीच त्यावर सहा. पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, भालचंद्र पाटील व निवृत्ती चित्ते यांनी सदर ठिकाणी सकाळी ८ वाजताच्या सुमारास धाड टाकून १५,८०० रूपये किंमतीचे दारूची हातभट्टी उध्वस्त केली. यात कच्चे रसायन १४०० लिटर, उकळते रसायन २५ लिटर, गाहभची तयार दारू ४० लिटर, बॅरल व कॅन असे एकूण १५,८०० रूपयांचा मुद्देमाल नाश करण्यात आले. यावेळी गावठी दारूची हातभट्टी तयार करत असताना एक जण मिळून आला. पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता आण्णा धोंडीराम मोरे (वय- ५३ रा. तळेगाव) असे सांगण्यात आले. या धडाकेबाज कारवाईमुळे ग्रामीण पोलिसांची प्रशंसा करण्यात येत आहे. निवृत्ती चित्ते यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.