चाळीसगाव प्रतिनिधी । शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी आज शिवसेनेने येथील तहसीलदारांना निवेदन दिले असून या मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील शेतकर्यांना सध्या मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यातच मागील वर्षी संपूर्ण दुष्काळ असताना देखील पिक विमा घेतलेल्या शेतकर्यांना विमा कंपन्यांनी नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही. अशा विविध मागण्या असलेले निवेदन आज चाळीसगाव तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण जिल्हा उपसमन्वयक महेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, शहर प्रमुख नाना कुमावत यांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले. या निवेदनात विमा कंपन्यांनी शेतकर्यांना त्वरित विम्याची नुकसान भरपाई द्यावी, मागील वर्षी कांद्याला मिळालेल्या कवडी मोल भावामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले त्यांना शासनाने २०० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केलेले आहे त्या लाभार्थी शेतकर्यांना कांद्याचे अनुदान त्वरित द्यावे; मका पिकावर लष्कर आळी चा प्रादुर्भाव वाढला असून त्याबाबत पाहणी करून कृषी विभागाने शेतकर्यांना मार्गदर्शन करून उपाययोजना करावी. अन्यथा शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी कर्जमाफी संदर्भातील शेतकर्यांचा संभ्रम दूर व्हावा व संपूर्ण कर्जमाफी झालेल्या शेतकर्यांना बँकांनी कर्ज देण्यास टाळाटाळ न करता त्वरित पिक कर्ज द्यावे व चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशा मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास चाळीसगाव शिवसेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, संघटक सुनील गायकवाड, उपतालुकाप्रमुख तुकाराम पाटील, हिम्मत निकम, अनिल राठोड, विलास भोई, संदीप पाटील, दिनेश विसपुते, प्रदीप पिंगळे, नाना शिंदे, ऋषिकेश देवरे, शैलेश सातपुते, दिलीप पाटील, प्रभाकर उगले, बापू लेणेकर, धर्मा काळे, निलेश गायके, पांडुरंग बोराडे, जगदिश मिस्त्री, गोरखनाथ सुतार, विजय पाटील, पोपट पाटील, संतोष खैरनार आदी उपस्थित होते.