चाळीसगावात रस्ता दुरूस्तीच्या कामास सुरूवात; संभाजी सेनेला यश

nivedan news

चाळीसगाव प्रतिनिधी । धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गवरील तरवाडी ते कन्नड घाटाच्या पायथ्यापर्यंत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. महामार्गावर पडलेले खड्ड्यांचे काम त्वरीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा संभाजी सेनेने केला होता. याची प्रशासनाने दखल घेत आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गवरील तरवाडी ते कन्नड घाटाच्या पायथ्यापर्यंत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा अशी झालेली असल्यामुळे संभाजी सेनेच्या वतीने संबंधित प्रशासनाला १ नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन १४ नोव्हेंबर पर्यंत काम सुरू न झाल्यास १५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावरील मेहुणबारे या गावी प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि प्रसंगी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणारे कोणत्याही परिस्थितीत शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला होता. परंतु प्रशासनाला संभाजी सेनेच्या यापूर्वीच्या अनेक आंदोलनांचा अनुभव असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी १४ नोव्हेंबर पासूनच महामार्ग दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू केले.

काम सुरू केल्याचे पत्र संभाजी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, तालुका उपाध्यक्ष विजय देशमुख, तालुका संघटक कृष्णा कोळी, तालुका संपर्क प्रमुख रवींद्र महाजन, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष अमर भोई, कामगार आघाडीचे पंकज गढरी, शेतकरी आघाडी तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, कामगार आघाडी तालुका उपाध्यक्ष सोनू महाजन, कामगार आघाडीचे प्रमोद महाजन यांच्या उपस्थितीत देण्यात आले. सदर काम सुरू झाल्यामुळे तालुक्यातील जनतेने आणि प्रवासी बांधवांनी समाधान व्यक्त केला आणि संभाजी सेनेचे अभिनंदन करून आभार मानले.

Protected Content