चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील लोंजे येथील सरपंच व ग्रामसेवकाने संगनमताने तब्बल ४३ लाख ६७ हजारांचा अपहार केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी नोटीस बजावली आहे.
तालुक्यातील लोंजे येथील सरपंच व ग्रामसेवकाने १४ व्या वित्त आयोगातील सुमारे ४३ लाख ६७ हजारांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. लोंजे ग्रामपंचायतीत जिजाबाई ताराचंद जाधव या सरपंच असताना तत्कालिन ग्रामसेवक नंदलाल किसन एशिराया यांनी संगनमत करून हा अपहार केल्याचे दिसून आले आहे.
याची दाखल घेत यातील ५० टक्के रक्कम नोटीस मिळाल्याच्या १० दिवसांत भरणा करावी. अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी बजावली आहे. तर या प्रकरणी कारवाई न झाल्यास उपोषणाला बसू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल राठोड यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.