चाळीसगाव प्रतिनिधी । माझ्या दुकानासमोर काचेच्या बाटल्या का फेकतात यावरून भंगार व्यवसाय करणार्या बाप व लेकास धारधार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील गोंधळ गल्ली, रिंग रोड परिसरात घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, अकील दादू खाटीक (रा.गोंधळ गल्ली, रिंग रोड चाळीसगाव) व मुलगा अल्ताफ खाटीक यांचा गोंधळ गल्ली येथे भंगार व्यवसाय आहे. त्यांच्या समोरच सोड्याचे दुकान आहे. माझ्या दुकानासमोर काचेच्या बाटल्या का फेकतात ? अशी विचारणा सोडा दुकानदार निलेश साळूंके (अंदाजे नाव) यांनी केली. बोलता बोलता वाद विकोपाला गेला. यानंतर साळूंके याने तुम्हाला संपवून टाकतो असे सांगत आपल्या खिशातून हत्यार काढत अकील दादू खाटीक यांच्या पोटावर उजव्या बाजूला वार केला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. मुलगा अल्ताफ खाटीक आड आल्यावर त्यांच्या छातीवर उजव्या बाजूला वार केला. तेवढ्यात शेजारी वास्तव्यास असलेला तौसिफ शकील खाटीक (वय-२६) सोडवायला गेला असता. त्यालाही दुखापत झाली.
ही घटना २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत संबंधीत व्यक्तींवर फिर्याददार शकील खाटीक यांच्या सांगण्यावरून कलम-३२६ अंतर्गत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाविर जाधव हे करीत आहेत.