चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कर्मचाऱ्यांनी बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामध्ये सामील झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बाजार समिती आवारात पूर्णपणे शुकशुकाट दिसून आला.
कांदा मार्केटमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर भरून विक्रीसाठी कांदे आणले होते. मात्र बाजार समिती बंद असल्याने लिलाव न झाल्यामुळे या शेतकऱ्यांना आपले वाहन परत न्यावी लागली. बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतले जावे ही या कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे भाजीपाला धान्य, कांदा या शेतमालाच्या विक्री व्यापारी उलाढालीतून जवळपास एक कोटी रुपयांच्या आसपास व्यवहार दररोज होत असतो. मात्र, आजपासून संप सूरू असेपर्यंत हा व्यवहार ठप्प होणार असल्याने बाजार समिती पर्यायाने शेतकरी, व्यापारी व शासन यांना यामुळे होणारे नुकसान सोसावे लागणार आहे. तर शंभर वर्षात पहिल्यांदा आम्ही आमच्या मागण्यांसाठी संपावर जात असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आव्हान चाळीसगाव बाजार समितीचे सचिव अशोक पाटील यांनी केले आहे.